सर्दी किंवा ॲलर्जी समजून दुर्लक्ष केल्यास ठरू शकते घातक
सोलापूर : सतत नाक बंद होणे, डोकेदुखी, डोळे चेहरा जड पडल्यासारखे वाटणे, किंवा डोक्याच्या अर्ध्या भागात तीव्र वेदना होते, तर ही सर्व लक्षणे असल्यास ती साधी सर्दी नसून, ‘सायनस’ची शक्यता असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बदलत्या हवामानात किंवा प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे हा विकार झपाट्याने वाढताना दिसत आहे. अनेकजण याकडे सामान्य सर्दी किंवा ॲलर्जी म्हणून दुर्लक्ष करतात, जी सर्दी वाढत जाऊन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
हवा बदल, धूळ, प्रदूषणाचा वाढता त्रास
शहरातील प्रदूषणग्रस्त वातावरणात हा विकार जास्त दिसतो. व्हायरल, बॅक्टेरियल किंवा बुरशीजन्य संक्रमण, सतत सर्दी, धूळ-प्रदूषण, हवामानातील बदल, ॲलर्जी किंवा अनुवांशिक कारणांमुळे हा विकार होतो. हवामानातील बदल, थंड हवा आणि वाढते प्रदूषण सायनसच्या रुग्णांसाठी सर्वात जास्त त्रासदायक ठरते.
काळजी कशी घ्याल?
धूळ किंवा धूर असलेल्या ठिकाणी मास्क वापरा, पुरेसे पाणी प्या, शरीराला उबदार ठेवा. सर्दी दीर्घकाळ टिकल्यास स्वतः औषधे घेऊ नका. तातडीने ईएनटी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
सर्दी, ॲलर्जीपेक्षा सायनस वेगळा कसा?
सामान्य सर्दी ही साधारण कांही दिवसांत बरी होते. मात्र, सायनसमध्ये १० दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणारी जाड स्त्रावासह तीव्र डोकेदुखी आणि चेहऱ्यावर जडपणा ही मुख्य वेगळी लक्षणे आहेत. सायनसमध्ये सूज आणि संसर्ग झाल्यामुळे हा त्रास दीर्घकाळ टिकतो.
श्वसन मार्गात अडथळे..
सायनस म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या कवटीच्या कवटीच्या हाडांमध्ये असलेली पोकळ, हवा भरलेली जागा, विशेषतः नाक आणि कपाळाच्या आसपास असलेली, जी श्वसनाच्या वेळी येणारे त्रासदायक कण अडकवण्यासाठी आणि साफ करण्यासाठी म्युकस तयार करते. या पोकळ्यांमध्ये संसर्ग झाल्यास सूज येते व श्वसन मार्गात अडथळे येतात.
“नाक सतत बंद राहत असेल, डोकेदुखी कमी होत नसेल, तर उशीर करू नका. नागरिकांनी वेळेत निदान आणि उपचार केल्यास संसर्गाचे प्रमाण कमी होऊ शकतो.”
डॉ. प्रसाद केळकर, ईएनटी तज्ज्ञ