अश्विनी रुग्णालयामध्ये कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी
अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित येथे रुग्ण मनीष चव्हाण यांच्यावर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. मनीष चव्हाण यांना वयाच्या ८ व्या वर्षी मम्पस झाल्याने कर्णबधिरता झाली. हळूहळू ही बधिरता वाढत गेली व त्यांना कायमस्वरूपी ऐकू न येण्याचे निदान झाले. वयाच्या ८ व्या वर्षापर्यंत त्यांनी उत्तम भाषा अवगत केली असल्याने त्यांची वाचा व भाषा विकसित होती.
केवळ ऐकू न आल्याने त्यांना समोरच्या व्यक्तीसोबत संभाषण करता येत नसायचे. परंतु ओठ्वाचन व चेहऱ्यावरील हावभाव जाणून ते थोडक्यात संभाषण करण्याचा प्रयत्न करायचे. त्यांना उत्तम दर्जाच्या श्रवणयंत्राचाही फायदा होत नसल्याने तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी कॉक्लीअर इम्प्लांट (रोपण) करण्याची तयारी दर्शवली.
नाक व घसा तज्ञ डॉ. प्रसाद केळकर यांच्या सल्ल्याने कॉक्लीअर इम्प्लांटसाठी लागणाऱ्या विविध चाचण्या करून, उजव्या कानासाठी इम्प्लांट करण्याचे सुनिश्चित केले. ही शस्त्रक्रिया डॉ. प्रसाद केळकर (कान, नाक व घसा तज्ञ) व डॉ. हेतल मारफतिया-पटेल (विभागप्रमुख, ईएनटी विमाग, केईएम हॉस्पिटल, मुंबई) यांनी एकत्रितरीत्या यशस्वीपणे पार पाडली. शस्त्रक्रियेकरिता डॉ. विद्याधर बोराडे (ईएनटी सर्जन) व भूलतज्ञ डॉ. विद्यानंद चव्हाण तसेच डॉ. तनिष्का बक्षी, डॉ. क्षितिजा पाठक व असिस्टंट राजू सरवदे यांचे सहकार्य लाभले.
शस्त्रक्रियेनंतर रोपणांचे (इम्प्लांट) चाचणी सुमेधा चव्हाण व सपना डाके (श्रवणतज्ञ ऑडिओलॉजिस्ट) यांनी कॉक्लीअर टीमच्या अन्य सदस्यांसमवेत पार पाडली. कॉक्लीअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया प्रामुख्याने जन्मापासून कर्णबधिरता असलेल्या लहान मुलांमध्ये केली जाते. त्यांना ऐकू येण्याची व वाचा विकसित होण्याची पुर्न:संधी मिळते. परंतु ही शस्त्रक्रिया केवळ लहान मुलांपर्यतच मर्यादित न राहता, मनीष चव्हाण यांच्यासारख्या माणसांमध्ये अथवा वृद्धामध्येही केली जाऊ शकते, असे डॉ. केळकर यांनी सांगितले. शस्त्रक्रिया सोलापूरमध्येही सोय उपलब्ध करून दिल्याचे डॉ. केळकर यांनी सांगितले.
शस्त्रक्रियेसाठी अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपीनभाई पटेल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र घुली, प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ मेरकर व वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. प्रशांत औरंगाबादकर यांचे तसेच ऑपरेशन थिएटर विभागातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लामले.