पारा घसरला; कान, नाक अन् घशाच्या रुग्णांमध्ये वाढ

सर्दीकडे दुर्लक्ष पडेल महागात : स्वतःच औषधोपचार करणे धोक्याचे

सोलापूर : कडाक्याच्या थंडीमुळे शहरात पारा घसरला असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषतः कान, नाक आणि घशाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तीव्र सर्दीमुळे नाक-कानात इन्फेक्शन वाढल्याच्या तक्रारी घेऊन रुग्ण ईएनटी डॉक्टरांकडे येत आहेत. सततचा ओलसरपणा, संक्रमण आणि दुर्लक्ष यामुळे चिकट स्राव येणे, कान फुटणे, चक्कर येणे, कानात शिट्टी वाजल्यासारखे वाटणे आदी त्रास वाढला आहे. वेळेत उपचार न झाल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते आणि त्यांच्या कानाची नळी लहान असल्याने इन्फेक्शन पटकन पसरते. मुले त्रास स्पष्टपणे सांगू शकत नसल्याने त्यांना ताप येणे, कान ओढणे, चिडचिड करणे, झोप न लागणे ही लक्षणे दिसतात. वेळेवर उपचार न झाल्यास कानाचा पडदा फाटण्याचा धोका असतो.

नाकातील इन्फेक्शन कानात उतरले
नाक आणि कान हे ‘युस्टेशियन ट्यूब’ नावाच्या नळीने जोडलेले असतात. तीव्र सर्दीमुळे नाकातील जंतू आणि स्राव या नळीतून कानाच्या मध्य भागात उतरतो. यामुळे कानाच्या पडद्यामागील भागात दाब वाढून तीव्र वेदना होतात, तसेच ऐकू कमी येण्याचा त्रास सुरू होतो.

कानात तेल टाकू नका
अनेकजण सर्दी किंवा कान दुखत असल्यास स्वतःच्या मनाने तेले, घरगुती रस किंवा औषधे कानात टाकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही पदार्थ कानात टाकल्यास इन्फेक्शन वाढू शकते, पडद्याला हानी पोहोचू शकते.

काय काळजी घ्यावी?
थंड वाऱ्यापासून संरक्षण मफलर / कानटोपी, गरम पाण्याची वाफ घ्या, भरपूर कोमट पाणी प्या, घरात ओलावा कमी ठेवा, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच स्प्रे / ड्रॉप्स वापरा.

“या थंडीत रुग्णांमध्ये नाकातील इन्फेक्शन प्रमाण वाढते. अनेकजण घरीच उपचार करण्याचा प्रयत्न करतात, जे धोकादायक आहे. वेळेत उपचार घेतले तर कान फुटणे टाळता येते.”
डॉ. प्रसाद केळकर, ईएनटी तज्ज्ञ