आठव्या वर्षापासून कर्णबधिर, ४४ वर्षापर्यंत पूर्ण बहिरेपणा, ५२ व्या वर्षी शस्त्रक्रियेनंतर ध्वनीशी संवाद, कुटुंबीय आनंदात
अश्विनी सहकारी रुग्णालयात प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी, आता साधताहेत संवाद
शरीरातील प्रत्येक अवयव हा खूप महत्वाचा आहे. त्यातील एकही अवयव निकामी झाल्यास त्याच्या यातना रुग्णांबरोबर कुटुंबालाही भोगाव्या लागतात. तसाच प्रकार मनिष चव्हाण यांच्या बाबतीतला. मनीष यांना वयाच्या ८ व्या वर्षापासून कर्णबधितरतेचा त्रास होता. वयाच्या ५२ व्या वर्षापर्यंत कर्णधिरपणा असल्यामुळे कोणाशी संवाद करीत नव्हते. त्यांच्या उजव्या कानाची कॉक्लीअर इन्प्लांटची शस्त्रक्रिया झाली, अन् मनिष हे समोरच्या व्यक्तीबरोबर संवाद करु लागल्याने कुटुंबीय आनंदी झाले. ही शस्त्रक्रिया सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात पहिल्यांदाच झाली आहे.
अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित येथे ८ जानेवारी रोजी रुग्ण मनिष चव्हाण (वय ५२) यांच्यावर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. मनिष यांना वयाच्या ८ व्या वर्षीपासून गालगंड झाल्याने कर्ण बधिरता झाली होती. हळूहळू ही बधिरता वाढत गेली व त्यांना कायमस्वरुपी ऐकू न येण्याचे निदान झाले. परंतु वयाच्या ८ व्या वर्षापर्यंत त्यांनी उत्तम भाषा अवगत केली असल्याने त्यांची वाचा व भाषा विकसित होती. केवळ ऐकू न आल्याने त्यांना समोरच्या व्यक्तीसोबत संभाषण करता येत नव्हता. कुटुंबियांशी हातवारे करुन बोलत होते. त्यांना उत्तम दर्जाच्या श्रवणयंत्राचाही फायदा होत नसल्याने तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने कॉक्लीअर इम्प्लांट (रोपण) ची प्रक्रिया केली आहे.
कान, नाक व घसा तज्ञ डॉ. प्रसाद केळकर यांच्या सल्ल्याने कॉक्लीअर इम्प्लांटसाठी लागणाऱ्या विविध चाचण्या करुन उजव्या कानासाठी इम्प्लांट करण्याचे नियोजन केले. ही शस्त्रक्रिया डॉ. केळकर व डॉ. हेतल मारफतिया पटेल (केईएम हॉस्पिटल, मुंबई) यांनी एकत्रितरित्या पार पाडली. शस्त्रक्रियेकरिता डॉ. विद्याधर बोराडे व भूलतज्ञ डॉ. विद्यानंद चव्हाण, तसेच डॉ. तनिष्का बक्षी, डॉ. क्षितिजा पाठक व असिस्टंट राजू सरवदे यांचे सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर रोपणांचे (इम्प्लांट) चाचणी सुमेधा चव्हाण व सपना डाके (श्रवणतज्ञ) यांनी कॉक्लीअर टीमच्या अन्य सदस्यांसमवेत पार पाडली.
प्रथमच वृध्द व्यक्तीवर शस्त्रक्रिया
कॉक्लीअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया प्रामुख्याने जन्मापासून कर्णबधिरता असलेल्या लहान मुलांमध्ये केली जाते. ही साधारणपणे पाच ते सहा वर्षाच्या आत केली जाते. ज्यामुळे त्यांना ऐकू येण्याची व वाचा विकसित होण्याची पुर्नःसंधी मिळते. परंतु ही शस्त्रक्रिया केवळ लहान मुलांपर्यंतच मर्यादित न राहता मनिष यांच्यासारख्या मोठ्या माणसांमध्ये अथवा वृध्दामध्येही केली जाऊ शकते. ही शस्त्रक्रिया सोलापूर मध्येही करण्याची सोय उपलब्ध करुन दिल्याचे डॉ. प्रसाद केळकर यांनी सांगितले. हा प्रयोग यशस्वी झाला म्हणता येईल.